रताळं एक कंदमूळ, गोड बटाटा (स्वीट पोटॅटो) म्हणून जगभर सर्वपरिचित आहे. रताळं आपण महाशिवरात्रीच्या नवरात्रीच्या व एकादशीच्या उपवासासाठी वापरतो. रताळ्यात पाणी ६८%, प्रथिने १%, मेद ०·३%, कर्बोदके (स्टार्च) २८%, तंतुमय पदार्थ व खनिज पदार्थ १% असून अ, क आणि ब-समूह जीवनसत्त्वे व लोह, पोटॅशियमसारखी खनिजे असतात. रताळे भरपूर स्टार्चने युक्त असून शरीराला ताबडतोब ऊर्जा देते त्यामुळे बटाट्यापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे.

रताळ्याचा शिरा: साहित्य

  • १ मध्यम आकाराचे रताळे (किसून अंदाजे सव्वा वाटी),
  • दोन कप दूध,
  • दोन-चार चमचे साजूक तूप,
  • तीन-चार चमचे साखर,
  • चिमूटभर वेलची पूड,
  • दोन चमचे ताजा खोवलेला नारळ,
  • काजू- बदामाचे काप

वाढणी: २ जणांसाठी

रताळ्याचा शिरा: कृती

१) प्रथम रताळ्याची साल काढून किसून घ्यावं. कढईत तूप गरम करावं, किसलेलं रताळं तुपात छान परतून घ्यावं. रंग जरासा बदलल्यावर त्यात दूध घालावं आणि उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर त्यात साखर घालावी. या दुधात रताळं नीट शिजायला हवं.
२) शेवटी त्यात वेलची पूड, काजू-बदामाचे काप आणि खोवलेलं खोबरं घालावेत, एक वाफ देऊन गॅस बंद करावा.
३)शिरा कोरडा करण्यापेक्षा जरा ओलसरच करावा. ‌रताळं न किसता उकडून कुस्कुरूनही वापरता येते.