आपल्या भारतीय संस्कृती मध्ये उपवासाला अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे.अनादि कालापासून ती परंपरा आपल्या देशात आहे. आपले सण, धार्मिक व्रतवैकल्य आणि उपवास यांची खूप छान सांगड घातली गेली आहे.परंतु आजकाल आपण जे उपवास करतो ते शरीराला त्रास होईल असेच असतात. ‘एकादशी दुप्पट खाशी’ अश्या पद्धतीचे असता, उपवासाचा अर्थच आहे वासापासून दूर राहणे.

आहाराचा सविस्तर विचार करणारे निसर्गोपचार हे शास्त्र आहे. निसर्गोपचारात 50 % भर योग्य आहारावर तर 25% आहार न घेण्यावर ( लंघन ) व 25% उपचारात्मक प्रक्रियावर आहे.
प्रख्यात डॉक्टर किवी म्हणतात “आजारपणात खाल्लेले अन्न रोग्याला नव्हे, तर रोगाला पोसते” 
‘विश्रांती व उपवास ह्या अत्यंत लाभदायक उपचार पद्धती आहे’.- बेंजामिन फ्रेंक्लीन

‘लंघन’ या शब्दाचा अर्थच आहे, लघु शरीर हलके करणे.

निसर्गोपचारातील लंघन व प्रचलित उपवास यात खूपच फरक आहे. प्राणीही लंघना चा वापर करता.जखमी वा विकृतीग्रस्त प्राणी काही दिवस लंघन करून एखाद्या शांत ठिकाणी पडून राहून औषधाशिवाय बरे होतात. काही प्राणी अंडी उबविण्याच्या कालखंडात तर काही जन्मानंतर लंघन करतात. आपल्याला गरज असेल तेव्हा आहार घेण्याची जी नैसर्गिक ईच्छा होते तशीच गरज नसताना आहार न घेण्याचीही ईच्छाहोते पण बर्‍याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

निसर्गोपचार व आयुर्वेद यामध्ये आहार-विहारा ला खूपच देण्यात आलेले आहे.आपल्या चुकीच्या आहार-विहाराच्या सवयीमुळे शरीर यंत्रणा बिघडते व ती बिघडलेली यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी शरीर प्रयत्न करत असते. या प्रयत्ंनातील महत्वाचा भाग म्हणजे शरीरातील अनावश्यक साठलेले पदार्थ बाहेर टाकणे. हीच विषारी द्रव्ये अनेक आजारांचे मुळ आहे.शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी विश्रांती व लंघन ह्या प्रक्रियांचा वापर केला जातो.

लंघनामुळे शरीरात काय घडते व फायदा-

आपण जो आहार घेतो त्यातून मिळणार्‍या पोषक घटकातून आपल्या शरीर अवयवांचे कार्य चालू असते.शरीर अवयवाची हालचाल, रक्ताभिसरण, श्वसन, पचन,मज्जासंस्थेचे कार्य अश्या सर्व कार्याकरता शक्ती लागते ही शक्तीआहार द्रव्यातून आपल्याला मिळते. आहार द्रव्याचे विघटन होवून त्यावर वेगवेगळ्या पाचक रसांची प्रक्रिया केली जाते व त्यातूनही तयार झालेले सर्व घटक लगेचच वापरले न जाता शरीरात निरनिराळ्या स्वरुपात साठवली जातात. आहार बंद केल्यामुळे पचन क्रिया थंडावते, शरीराला शक्तीपूरवणार्‍या द्रव्याचा पुरवठा थांबतो. लंघनात पचनाची क्रिया बंद झाली तरी शरीराच्या ईतर क्रिया चालूच असतात, व त्यासाठी लागणारी शक्तीशरीरात साठवलेल्या घटका पासून मिळत जाते.अनावश्यक वजनही कमी होते. पण वजन कमी करणे हा लंघनाचा एकमेव उद्देश नाही हा जाता जाता मिळणारा एक फायदा आहे.

दीर्घकाल लंघन केल्याने दीर्घकाल स्वछता होते. शरीरातील अनेक अवयवामधील अशुद्धता दूर झाल्याने साहजिकच त्या अवयवांची कार्यक्षमता वाढते, शरीराच्या मुळाशी असलेला मलसंचय नाहीसा झाल्याने ते विकारी बरे होतात.

आपण जेव्हा आहार घेतो तेव्हा पचन संस्थेच्या सर्व अवयवांना अधिक काम करावे लागते, त्याच बरोबर रक्ताभिसरण, श्वसन संस्थेलाही अधिक काम करावे लागते. लंघन काळात मात्र सर्व अवयवांना विश्रांती मिळते तसेच अनावश्यक शक्तीवाया जात नाही.या दोन्ही गोष्टीमुळे शरीरातील बिघडलेले कार्य दुरुस्त करायला वेळ व शक्ती मिळते.लंघनामुळे बरेच दुर्धर आजार बरे होतात तेही कुठल्याही औषधांशिवाय. म्हणूनच ‘लङ्घ्न्म परम औषधीम’म्हंटले आहे. म्हणजेच लंघन हे सर्व श्रेष्ठ असे औषधआहे.

शरीरातील प्रत्येक पेशी रक्तातून अन्नरस, प्रथिने, जीवनसत्व, क्षार, प्राणवायू यासारखे आवश्यक घटक घेवून अशुद्ध, टाकावू पदार्थ रक्तात सोडत असतात . लंघनात पेशीचे कार्य कमी झाल्याने नवीन पोषक द्रव्ये घेण्यास फारशी शक्ती खर्च करावी लागत नाही, व अशुद्ध द्रव्य शरीरातून बाहेर टाकण्यासाठी ती शक्ती वापरली जाते.

सर्व शरीराकडून रक्तात जमा झालेली अशुद्ध द्रव्य मूत्रपिंडाच्या सहाय्याने मुत्रातून बाहेर टाकली जातात. मोठ्या आतड्याचे काम कमी झाल्याने त्यांना विश्रांती मिळते.
सर्वच अवयवांची कार्यक्षमता वाढते, विषद्र्व्य शरीराबाहेर पडल्याने विकारही बरे होतात. लंघन औषधाप्रमाणे काम करत असले तरी ते करताना घ्यावयाची काळजी-
लंघनात आहार घेत नसलो तरी शरीराचे कार्य चालूच असते, अन्नसाठा वापरुन ते चालू असते. शरीर जिवंत राहण्यासाठी श्वसन, रक्ताभिसरण, मज्जासंस्था तसेच ईतर संस्थेची कामे चालूच असतात व ते चालण्यास पुरेशी पोषक द्रव्य मिळाली नाही तर धोका निर्माण होवू शकतो व त्याचमुळे दीर्घकाल लंघन करताना अनुभवी व तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे मनाने करू नये. चुकीचे झाल्यास त्रास होवू शकतो.

लंघन करतांना पाळायची पथ्ये –

तज्ञ डॉक्टर शील्टन सांगतात ‘खर म्हणजे लंघन सुरू करण्यासाठी कोणतीच पूर्व तयारी करण्याची गरज नाही’खरी तयारी तर मनाचीच करावी लागते. आत्मविश्वास व श्रद्धा नसेल तर लंघन करू नये.

लंघन काळात शरीरातील अशुद्धी दूर करण्यास शरीरातील शक्ती खर्च होते व बाहेरून येणार्‍या अन्नाचा पुरवठाही बंद असतो. त्यासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक विश्रांती ची आवश्यकता असते. शरीर व मनाला ताण येईल अशी कामे करू नये. त्याच बरोबर वादविवाद,अति ताण येईल असे वाचन, नैराश्य येईल असे काहीही बघू किवा ऐकूही नये. शांत, प्रसन्न निसर्गरम्य वातावरणात लंघन केले तर त्याचा अधिक फायदा मिळेल. त्याचमुळे निसर्गोपचार केंद्रात पोषक वातावरण असल्याने तेथे केलेले लंघन जास्त योग्य.

लंघन काळात शरीराला दमवणारे/थकवणारे कुठलेही व्यायाम करू नये, हलके योगासने,प्राणायाम केल्यास अधिक फायदा होतो.शरीर व मन शांत झाल्याने meditation जास्त चांगले होते असा माझा अनुभव आहे.

लंघन काळात शरीरातील तापमानात बदल होतो थंडीचा प्रतिकार करण्याची शक्ती कमी होत असल्याने शरीर उबदार राहील याकडे लक्ष द्यावे.
लंघन काळात पेशींमधून अशुद्ध द्रव्ये मूत्रावाटे मूत्रपिंडातून बाहेर टाकली जातात.पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तहान जास्त लागते त्यामुळे पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते, अति प्रमाणात पाणी घेवू नये तहान भागेल येवढेच घ्यावे.

लंघन काळात शरीरातील अशुद्धता शरीराबाहेर काढून टाकण्याचे कार्य चालू असते व हे कार्य मूत्रपिंड, मोठे आतडे, त्वचा या उत्सर्जक इंद्रिया मार्फत चालते. हे कार्य अधिक गतिमान होण्यासाठी निसर्गोपचारतील काही उपचारात्मक प्रक्रियांचीही जोड दिली जाते. जसे की मोठे आतडयाचे कार्य वाढण्याकरता एनिमा,मूत्रपिंडाचे कार्य वाढवण्यासाठी अधिक औषधी युक्त पाण्याचे सेवन, व त्वचेचे कार्य वाढवण्यासाठी बाष्पस्नान सांगितले जाते. लंघन काळात उत्सर्जक इंद्रिये आपले काम करीतच असता पण कधी कधी त्यांच्यावर अशी जबरदस्ती केली तर पुढे जावून त्यांच्या कार्यात बिघाड होवू शकतो.त्यामुळे गरज नसेल तर ईतर उपचारात्मक प्रक्रियांचा वापर करू नये.

लंघन काळात खूप गरम / थंड पाण्याने स्नान करू नये, तसेच स्नान करतांना कमीत कमी शक्ती/ ऊर्जा खर्च होईल याकडे लक्ष्य द्यावे.
लंघन काळात सूर्यस्नानही उपयुक्त ठरते. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असताना करावे.सूर्य स्नानाच्या वेळेस खूप वारा असू नये तसेच स्ंनानाचा कालावधी हळूहळू वाढवावा.
वरील सर्व गोष्टी लक्ष्यात ठेवून लंघन केले तरी प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते त्यामुळे लंघन काळात कुठले त्रास होतील हे सांगता येत नाही. काही वेळा लंघन थांबवावे लागते त्यामुळे ते योग्य अनुभवी तज्ञाच्या मार्गदर्शनानेच करावे. लंघन काळात त्या व्यक्तीची शारीरिक व मानसिक स्थिति प्रसन्न असणे आवश्यक आहे.

लंघन सोडतांना घ्यावयाची काळजी-

दीर्घ काल लंघन केल्यानंतर सोडताना एकदम संपूर्ण आहार घेवू नये.दीर्घ काल लंघन केल्यावर त्याची समाप्ती व आहार घेण्याचा प्रारंभ करताना रसाहार घ्यावा व नंतर हळूहळू आहार वाढवावा.दीर्घ काल विश्रांती घेतलेल्या पचन संस्थेला पुन्हा कार्यरत करतांना त्या संस्थेवर एकदम भार टाकू नये. म्हणूनच प्रारंभ ताज्या फळांच्या रसाने किवा भाज्यांच्या रसापासून करून मग वेगवेगळ्या पेज नंतर 8 दिवसापर्यंत पूर्ण आहारपर्यंत पोचावे ( liquid to semisolid to solid food to normal diet)अर्थातच हा कालावधी मार्गदर्शनाने ठरवावा.
खूप तिखट, मसालेदार पदार्थ खावू नये.खरे तर तिखट खाल्ले ही जात नाही. चहा, कॉफी, मद्य, मासाहारी पदार्थ पुर्णपणे टाळावे. आहाराचे नियम पाळले गेले नाही तर मात्र लंघनाचा फायदा न होता त्रासच होवू शकतो.

लंघन किती दिवस करावे-

लंघनाचा उद्देश पूर्ण साध्य झाला की लंघन सोडावे. शरीराची अंतर्गत शुद्धता व संतुलित अवस्था साध्य होईपर्यंत लंघन चालू ठेवले पाहिजे. ही अवस्था साध्य झाली की नैसर्गिक भुकेची प्रेरणा जागृत होते. अश्या वेळी जीभ स्वछ झालेली असते, तोंडाची दुर्घंधी नाहीशी होवून चांगली चव आलेली असते. शरीराची शुद्धी झाल्याची ही लक्षणे आहेत.
लंघन चांगले व योग्य पद्धतीने झाल्यास मनही खूप शांत होते. अनेक विकारांचे मूळ मनात असते. कारण शरीर मनाचे अतूट नाते आहे व एकमेकावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्याही व्यक्तीची प्रगती होण्यास मदत होते. एक प्रकारची संयमित वृती प्राप्त होते.लंघन एक प्रकारे शास्त्रीय दृष्टीकोण ठेवून केला जाणारा उपवासच आहे.
लंघनाला आध्यात्मिक जोड देण्यासाठी ओंकारजप, ध्यान,योगनिद्र,चांगले वाचन केल्यास निश्शितच शरीराबरोबर मंनाचीही शुद्धी होण्यास याचा उपयोग होईल. ह्या नवरात्रीच्या 9 दिवसात नक्कीच असा उपवास करायला हरकत नाही. अर्थातच योग्य मार्गदर्शनाने!