योग आणि स्त्रिया, ‘योग’ या शब्दाची व्याख्या आणि व्याप्ती खूपच मोठी आहे. ‘इंद्रियांचा निरोध’ म्हणजे योग. (उपनिषदे) ‘चित्तवृत्तीचा निरोध’ म्हणजे योग. (पतंजली) समत्व म्हणजे योग. (गीता) तर संसारातून समर्थपणे तरुन जाण्याची कला म्हणजे योग (योगवासिष्ठ) अशा योगाच्या अनेक व्याख्या आहेत. परंतु या साऱ्यांचा मूळ अर्थ एकच आहे. श्री. अरबिंदो म्हणतात त्यानुसार, ‘योग ही स्वतःला निरखून पारखून घेण्याची, सुधारण्याची आंतरयात्रा आहे’.

योग ही जीवन कला आहे. योग म्हणजे ‘आत्मदर्शन’. या दृष्टीकोनातून स्त्री जीवनातील तारुण्य, प्रौढत्व व वार्धक्य या प्रवासात शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योगाभ्यासाचा निश्चितच उपयोग होतो. ह्या विषयावर आजवर अनेक संशोधने झाली आहेत. बाहेरच्या देशात तसेच भारतात जसे कैवल्यधाम (लोणावळा), S.VYASA (बैगलोर), Iyengar yoga institute (पुणे) यामध्ये तर अनेक व्याधींवर अनेक प्रकारची उपयुक्त संशोधने तसेच अनेक प्रकारचे उपयुक्त योगाभ्यास सांगितले आहेत.

योग हे मुळात व्याधीनिवारणाचे शास्त्र नाही. परंतु योग साधनेचे अनेक शारीरिक व मानसिक लाभ दिसून येतात. परिणामी हळूहळू आपण मनातून अतिशय शांत होऊ लागतो. खूप बरे वाटू लागते. याचा दृश्य परिणाम म्हणून आपल्या शारीरिक व्याधी आटोक्यात आणणे शक्य होऊ लागते.

स्त्री जीवनातील 3 महत्वाचे टप्पे 

  1. ऋतूप्राप्ती ( मासिक पाळी सुरू होणे)
  2. गर्भारपण व प्रसूती 
  3. रजोनिवृत्ती (मासिक पाळी बंद होणे)

योग आणि स्त्रिया, या महत्वाच्या टप्यांमध्ये अनेक स्थित्यंतरे आहेत. या सर्व प्रवासात तिच्या शरीर मनावरही निश्चितच परिणाम होतो. निसर्गाने स्त्री पुरुष भेद करताना स्त्रीला एक महत्वाचा अवयव दिला आहे तो म्हणजे ‘गर्भाशय’ व त्या अनुषंगाने येणार्‍या, निसर्गाने दिलेल्या जबाबदार्‍या स्त्रीला स्वीकाराव्याच लागतात. त्यातच आजची स्त्री घर, नोकरी, व्यवसाय, मुले, सासर माहेर नातेसंबंध, कामाच्या ठिकाणचे उतार चढाव, targets, कधी कधी अति महत्वाकांशा अश्या अनेक कसोट्या पार करतांना ती सुपरविमेन झाली आहे. मात्र या नादात तिची प्रचंड शारीरिक व मानसिक दमछाक होते आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे स्त्रीची दिनचर्या पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शिवाय स्त्री आपल्या तब्येतीबद्दल अतिशय निष्काळजी आहे.

ऋतूप्राप्ती ( मासिक पाळी सुरू होणे) मासिक पाळी वयाच्या १० ते १५ व्या वर्षी सुरू होवून ४५ ते ५५ व्या वर्षी थांबते. निकोप रजस्राव अंडाशयाच्या कार्यक्षमतेवर व pituitary ग्रंथी च्या आरोग्यावर अवलंबून असतो. मासिक पाळीच्या चक्रावर नियंत्रण ठेवणार्‍या hypothalamus चा pituitary ग्रंथीशी फार जवळचा संबंध असतो. मुलीचे परिपक्व स्त्री  देहात रूपांतर होत असताना आसने व प्राणायामाचा निशितच फायदा होतो. विपरीत स्थितीतील व मागे वाकून करायच्या आसनामुळे pituitary ग्रंथीना चालना मिळते. पुढे वाकून करायच्या आसनामुळे ओटीपोटातील इंद्रियाना शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. अस्थिच्या योग्य वाढीसाठी व शरीराचा आकार सुधारण्यासाठी उभ्या स्थितीतील आसने अतिशय उपयुक्त असतात. शारीरिक बदलाबरोबर मानसिक बदलही ह्या वयात होत असतात. शारीरिक बदल अंत:स्त्रावी ग्रंथींच्या संप्रेरकांच्या संतुलनावर अवलंबून असतात तर मानसिक बदल हे आजूबाजूच्या परिस्थितीवर

मासिक फळीतील विकार जसे पाळी न येणे, रजस्त्राव अतिशय कष्टमय होणे, खूप जास्त / कमी / अनियमित  रक्तस्रावपाळी काळ जास्त / कमी असणे, श्वेत प्रदर, पाळी पूर्व 

त्रास इत्यादी यांवर योगाभ्यासाचा उपयोग होतो. आसने व प्राणायामाने इंद्रियातील रचनेतील दोष नाहीसे होतात. संप्रेरकांच्या स्रावात संतुलन राहते. अंत:स्त्रावीग्रंथीं अधिक कार्यक्षम बनतात. गर्भाशयाच्या व इतर इंद्रियांच्या स्नायूंना बळकटी येते. मानसिक ताण कमी होतो.

आसनामध्ये, प्राणायामामध्ये रक्ताभिसरणात बदल होतो. काही ठिकाणी रक्तपुरवठा मुद्दाम वाढविला जातो तर काही ठिकाणी तो कमी केला जातो. सर्व पेशींना, ग्रंथीना, जोडांना रक्तपुरवठा अवश्य मिळतो. म्हणूनच थोड्याच दिवसात योगाभ्यासामुळे ताजेतवाने, तजेलदार वाटू लागते व चेहर्यावर तेज येते.

गर्भधारणा: आजच्या काळात बहुतांश स्त्रियांचे लग्नाचेगर्भधारणेचे वय पूर्वीपेक्षा वाढले आहे व त्या अनुषंगाने येणार्‍या समस्याही. Obesity, Stress, Thyroid, PCOS, Fibroid अशा कारणांमुळे गर्भधारणा होण्यासच अडथळा होत आहे. योग्य आसनाच्या दैनंदिन सरावामुळे व प्राणायाम, ध्यानधारणा यामुळे thyroid ग्रंथीचे कार्य योग्य चालण्यास व मासिक पाळी च्या समस्या दूर होण्यास मदत होते. गर्भधारणा झाल्यानंतरही उच्चरक्त दाब मधुमेह, वारंवार होणारे गर्भपात या सर्वांकरता योगाभ्यास उपयुक्त आहे

गर्भधारणा झाल्यानंतर केलेल्या विशिष्ट आसनांमुळे ओतीपोटातील स्नायूंना बळकटी येते व त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते, प्रजनन संस्था अधिक सक्षम व सशक्त होते, पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो. या सर्व गोष्टींमुळे गरोदरपणाचा काळ सुसह्य होतो.

प्रसूती : गर्भधारणेच्याच्या  काळात केलेल्या योगाभ्यासाच्या सरावामुळे स्नायूंना बळकटी येवून प्रसूतीच्या वेळेस अधिक कार्यक्ष्यम होतात तसेच मानसिक तणावही कमी होतो.

रजोनिवृत्ती: रजोनिवृत्तीमध्ये रजस्त्रावाचे प्रमाण कमी होवून प्रजनन संस्थेचे कार्य संपत आल्याची नैसर्गिक लक्षणे येतात. साधारण चाळीस ते पन्नास वर्षाच्या वयात स्त्रियांच्या मासिक चक्रात बदल घडतात. मासिक पाळी थांबण्याचा हा कालावधी असतो. स्त्री जीवनातील शारीरिक व मानसिक स्थित्यंतराचा व बदलांचा हा कालावधी असतो

स्त्रीत्व गमवल्याच्या जाणिवेतून भावनिक संघर्ष, मानसिक असंतुलन, शारीरिक अशक्तपणा इ. लक्षणेजाणवू लागतात. त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी शारीरिक, मानसिक स्थैर्याची गरज असते. यासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरतो. संथ व सावकाश केली जाणारी आसने शरीराला ताजेतवाने ठेवतात. तसेच स्नायू व सांध्याची ताकदही टिकवून ठेवतात. शरीराची झीज होण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते. चयापचय क्रिया योग्य राहते. अंत:स्रावी ग्रंथीवर योग्य ताण दाब येत राहतात. त्यामुळे त्यांच्या संप्रेरकांच्या बदलाचा इतर अंत:स्रावी ग्रंथीच्या कार्यावर होणारा विपरीत परिणाम टाळता येतो. रक्तदाब सामान्य राखता येतो व शरीरावर इतर दुष्परिणाम होण्यापासून वाचवता येते. रजोनिवृत्तीतील होणारे शारीरिक व मानसिक त्रास कमी करण्याकरिता hormonal replacement therapy वापरली जाते. त्याचा उपयोग होतोच पण यालाही मर्यादा आहेत. तसेच त्याचे दुष्पपरिणामही आहेत. Estrogen दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात घेतले तर स्तन किंवा गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. योगोपचाराचे मात्र दुष्परिणाम आढळून येत नाहीत. योगअभ्यास काळजीपूर्वक, आपआपल्या क्षमतेनुसार व योग्य मार्गदर्शनानुसार केला तर त्याचे फायदेच झाल्याचे आढळून येतात.

त्याचबरोबर मनातील नकारात्मक भावना बदलण्यास योगाभ्यासाची खूप मदत होते. स्त्रिला स्वत:चे स्त्रीत्व संपले तर आपले अस्तित्वच महत्वाचे नाही अशी विचित्र भावना मनात घर करते. स्त्रीत्व गमावल्याच्या जाणीवेतून भावनिक संघर्ष, मानसिक असंतुलनामुळे होणारी चिडचिड, मत्सर, नैराश्य, भीती व चिंता हे सर्व रजोनिवृत्ती अवस्थेतील स्त्री च्या वाट्याला येऊ शकते. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा हा महत्वाचा काळ असतो. अशा वेळी योग्य ती योगसाधना त्यातील तात्विक विचारांनी स्त्रीला स्वत:चे खरे अस्तित्व, महत्व, आनंदाची अनुभूती देते. यामुळे स्वत:चे माणूसपण शोधता येते व स्वत:ला रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक प्रक्रियेत सहजतेने सहकार्य करता येते. मज्जासंस्थेला शांत करणारा व शरीर मनाचा समतोल साधणारा योगासनांचा सराव अतिशय उपयुक्त ठरतो

स्त्री च्या वरील प्रत्येक टप्यात अंत:स्त्रावी ग्रंथींच्या संप्रेरकांचा महत्वाचा सहभाग असतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये योगप्रक्रियांचा अंत:स्त्रावी ग्रंथींवर लवकर व प्रभावी असा परिणाम दिसून येतो. मी स्वतः आहार व योग तज्ञ म्हणून काम करतांना माझ्या रोजच्या प्रॅक्टिस मध्ये मला वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त असणार्‍या महिला भेटतात. त्यात  लठ्ठपणा ही आजच्या काळात भेडसावणारी सर्वात महत्वाची समस्या आहे. नियमित योगाभ्यास व योग्य आहार मार्गदर्शनाने वजन कमी होण्यास मदत होते तेही कुठलाही side effect न होता. मुळातच योगाभ्यास केल्यामुळे मानसिक संतुलन प्राप्त होते व त्यामुळे अवाजवी खाण्यास आळा बसतो, food cravings कमी होतात, hormonal balance तसेच एकूणच जीवनात एक प्रकारचा नियमितपणा येतो. नियमित योगाभ्यासामुळे काहींचा रक्तदाब, thyroid चे कार्य normal होते व त्यांची औषधे कमी किंवा बंदही होऊ शकतात. कितीतरी स्त्रियांची मासिक पाळी नियमित होवून गर्भधारणेला मदत होते. मानसिक आजारावर घेतली जाणारी औषधे कमी होतात.

स्त्री जीवनात येणार्‍या समस्यांवर योगाभ्यास उपयुक्त आहे परंतु तो योग्य पद्धतीने व तज्ञाच्या मार्गदर्शनाने केला गेला पाहिजे. स्त्री ही कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा आधारस्तंभ आहे. तिने तिच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. नियमित योगाभ्यासाने तिला सुदृढ शरीर व निरोगी मन प्राप्त होईल. यामुळे सकारात्मक वृत्ती वाढेल व तिच्यावर असलेल्या जबाबदार्‍याचे  ओझे न वाटता त्या ती उत्तम रितीने पार पडू शकेल. स्वत:च्या आयुष्याबरोबरच आपल्या सानिध्यात येणार्‍या इतरांच्या ही ती आयुष्यात आनंद फुलवू शकेल!