आज योगाबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे ‘जागतिक योगा दिवस- २१ जून’. आज आहारतज्ज्ञ म्हणून अनेकांना डाएट प्लॅन देते पण त्याबरोबर व्यायाम हा विषय साहजिकच येतो. वजन वाढवणे असो किंवा कमी करणे असो; physical fitness साठी व्यायाम आवश्यक आहे. आजकाल व्यायामासाठी अनेक नवीन पद्धती आल्या आहेत – जिम, तिथली मशिन्स, डान्स प्रकार, झुंबा इ. पण योग हा पूर्वापार चालत आलेला प्रकार असून त्याचे पुराणात दाखले आहेत. आज सर्व जग योगाचा अभ्यास करत आहे.
लहानपणापासून माझ्यावर योगासनांचे संस्कार झाले. माझी आई एक उत्तम योगशिक्षिका असल्याने अगदी लहानपणीच सूर्यनमस्कार आणि छोटी छोटी आसने येऊ लागली. योगासन याचा सोपा अर्थ म्हणजे ‘सहज सुलभ आसन’. शरीराला जेवढा ताण सहन होईल तेवढाच ताण देऊन आसन करणे. पुढे योगविद्याधाम या संस्थेशी संबंध आला व योग हा विषय किती मोठा आहे हे जाणवले. मला आसनांची आवडणारी गोष्ट म्हणजे त्याची नावं. किती समर्पक असतात. नावांवरूनच कळते कि हे कोणत्या प्रकारचे आसन आहे. जसे भुजंगासन म्हणजे सापाप्रमाणे, मार्जारासन म्हणजे मांजरीप्रमाणे, त्रिकोणासन म्हणजे शरीराची त्रिकोणी अवस्था किंवा धनुरासन म्हणजे धनुष्याप्रमाणे कृती करणे.
योगासनांचे फायदे अनेकांना माहित आहेत पण त्याबद्दल लोकांचे वेगवेगळे समज – गैरसमज आहेत. चला तर मग ते जाणून घेऊयात.
१. योगामुळे वजन कमी होते का?
अनेकांना हा पडलेला प्रश्न असतो. योगासने शरीराला लवचिक बनवतात. नियमित योगासने करणे व त्याची intensity वाढवणे हे केल्यास वजन नक्कीच कमी करता येते. जसे सूर्यनमस्काराची संख्या हळूहळू वाढवून ते घालण्याचा speed वाढवला तर दोन्ही फायदे मिळू शकतात. योगासनांचा आणखी एक फायदा म्हणजे हा व्यायामप्रकार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मशीन्स अथवा इतर साधने लागत नाहीत. म्हणूनच आपण ही आसने कधीही आणि कुठेही करू शकतो.

२. Aqua योगा,पॉवर योगा कोणता करावा?
आजकाल लोकांना योगासाठी तयार करायला अश्या नावांचा फायदा होतो असे मला वाटते. अजूनही अनेक नावांचे योगा प्रकार ऐकायला मिळतात. Aqua योगा हा पाण्यातील योग प्रकार, किंवा पॉवर योगा म्हणजे फ्लोअर योगा विथ म्युझिक. दोन्ही मध्ये योगासनांचे तेच प्रकार असतात; पण करण्यात फरक असतो. जो प्रकार करणे सोपे वाटेल तो करावा.
३ योगा कोणी करावा?
योगा हा कोणत्याही वयातील व्यक्ती अगदी सहज करू शकतात. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही. गर्भवती स्त्रियानांही विशिष्ठ पद्धतीची योगासने फायदेशीर ठरतात. वेगवेगळ्या दुखण्यांवरती सुद्धा विशिष्ठ प्रकारची आसने केल्यास आराम मिळतो. तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा.
४. योगासाठी शास्त्रीय अभ्यास आवश्यक आहे का?
प्रत्येक नवीन गोष्ट करताना त्याचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहे. योग करताना योग्य पद्धत माहिती असेल तर करणे सोपे जाते. अनेक संस्था या साठी परीक्षाही घेतात.
५. योगा साठी प्राणायाम येणे गरजेचे आहे का?
आसने करताना श्वासावर नियंत्रण आवश्यक असते. प्राणायामामध्ये श्वासावर योग्य नियंत्रण कसे ठेवावे हे शिकवले जाते . प्राणायामाचे विविध प्रकार आहेत. आसने करताना कधी श्वास आत घायचा कधी सोडायचा हे माहिती असेल तर त्या आसनांचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो.
योग हा शब्द युज धातू पासून तयार झाला आहे. युज म्हणजे जोडणे. आत्म्याचे परमात्म्या बरोबर जोडले जाणे. त्यासाठी करावयाच्या गोष्टीतील आसने आणि प्राणायाम हा एक भाग आहे. पतंजली मुनींनी अष्टांग योग सांगितले आहेत. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याचा अंतर्भाव आहे.
योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करावा हे म्हणणे अगदी योग्य आहे. पुस्तकात वाचून किंवा कोणाचे बघून करण्या पेक्षा ज्या त्यातील तज्ज्ञ आहेत त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यामुळे आपले बरेच गैरसमज दूर होतील आणि फायदा नक्की होईल. तेव्हा या योगदिना पासून योगाभ्यास करूया!
ना हम कर्ता हरीही कर्ता हरीही कर्ता ही केवलम|
ना हम कर्ता योग कर्ता योग कर्ताही केवलम|
अर्थ: रोजच्या जीवनातील सर्व गोष्टी मी करत नसून त्या माझ्याकडून ‘हरी’ म्हणजे ईश्वर किंवा एक अदृश शक्ती करवून घेत आहे. त्याचप्रमाणे मी काही करतोय हा अहंकार न ठेवता योगच माझ्याकडून सर्व करून घेत आहे, योगामुळे माझे शरीर चांगले सुदृढ राहणार आहे अशा भावनेने (शरणागत मुद्रा) योगाभ्यास करूया.