४० वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये मी शास्त्र शाखेत शिकत होते.

 

वनस्पतीशास्त्र विभागात आमचं जाणं येणं असायचं. तेव्हा एक खणखणीत आवाज नेहमी कानी पडायचा. आवाज बॉटनीच्या एचओडींचा असल्य़ाचं कळलं. आवाजाची मालकिण एक कृश बांध्याची मध्यमवयीन स्त्री होती. उंच, नेसलेली साधीशीच धुवट साडीचष्मा आणि वेणीला चक्क पुडीचा दोरा बांधलेला असायचा. त्याचं नाव डॉ. हेमा साने. त्या चालत चालत कॉलेजमध्ये ये जा करत. त्यांच्या या अवतारावर लोकं त्यांच्या मागे हसत. पण लोकांची त्या मुळीच फिकीर करत नसत. त्यांच्या या असामान्य दिसण्या वागण्याकडे मी आकर्षित झाले. त्या आमच्या वर्गाला शिकवायला कधीच नव्हत्या. तरी सुद्धा मी त्यांच्या घरी येणं जाणं सुरू केलं.

 

तांबड्या जोगेश्वरीजवळ त्यांचा वाडा आहे. पत्र्याचे फाटक ढकलून वाड्यात शिरताच एका गूढरम्य वातावरणात प्रवेश करत असल्याची आपल्याला जाणीव होते. पडक्या भिंतीखूप वाढलेली गुळवेलपक्षीकुजनघराच्या दाराशेजारीच असलेली विहीरदारासमोरच असलेला मोठा पलंग.भिंतीवरचे एक जुनेपुराणे घड्याळ. घरातील अंधारलेलं वातावरण (कारण अजूनही त्यांनी घरात विजेचे कनेक्शनच घेतले नाहीये!) घरभर पुस्तकांचा पडलेला पसारा. पुस्तकांच्या त्या पसार्यात शांतपणे लेखन वाचन करत बसलेल्या सानेबाई. आणि त्यांच्या मांडीवर बसलेलं ध्यानमग्न मांजर. हे चित्र माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे. एरवी देवळांपासून मी चार हात दूर असते. पण माझ्या या जोगेश्वरीचं दर्शन घ्यायला मी नियमित त्यांच्या घरी जाऊ लागले.

 

 

बाई माझं दिलखुलास स्वागत करत. हातावर काही तरी आगळा वेगळा खाऊ ठेवत. बौद्धिक मेजवानी तर ठरलेलीच असे. पुस्तकांच्या पसार्यातून नेमकेपणाने एखादं पुस्तक माझ्या हाती ठेवत. पुस्तकाबद्दल आत्मियतेने माहिती देत. बाईंनी स्वत: ३० हून अधिक पुस्तकं (रॉकेलच्या चिमणीच्या प्रकाशात, सध्या सौरदिव्याच्या प्रकाशात लिहीली आहेत. त्यातील काही पाठ्यपुस्तकं म्हणून नेमली गेली आहेत.

 

बाईंचं घर म्हणजे कुत्रीमांजरी यांचं माहेर होतं. बाईंनी काही भटक्या प्राण्यांना आसरा दिला होता. मुंगूसंखारीदयाळ पक्षी नियमितपणे त्यांच्या घराला भेटी देत.बाई त्या सर्वांचे खाणं पिणंऔषधपाणी प्रेमाने करत. मला कौतुकानें त्यांच्या प्राणीमित्रांबद्दल गोष्टी सांगत. म्हणूनच  बाईंच्या घरी गेलं की मला मैत्रेयी गार्गीच्या आश्रमात गेल्यासारखं वाटे. माझ्या मनात प्राणीप्रेमाचं बीज बाईंच्या घरीच पडलं.

 

माणसांना त्यांच्या कपड्यांवरून, पैश्यांवरुन, वयावरून जोखू नये. माणसांशी माणसासारखं वागावं. हे महत्वाचे जीवनमूल्य बाईंनी मला त्यांच्या वागण्यातून शिकविलं. बाईंचं माणसांशी असलेलं नातं दयाळूपणाचं असे. माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी त्यांनी आपलेसे केले होते. लहान मुलांशी त्यांची छान गट्टी जमत असे. त्यांच्या घरासमोर बसणार्या विक्रेत्यांना त्या मदत करत. मोठमोठ्या परिषदांमध्ये विद्वान लोकांशी त्या सहजतेने संवाद साधत.

 

लोणारला मी बाईंबरोबर एका अभ्यास सहलीला गेले होते. तिथे त्यांनी लोणार सरोवरातील आगळ्यावेगळ्या जीवसृष्टीची ओळख तर करून दिलीच पण तेथील दैत्यसूदन मंदिरातील एकेक मूर्ती वाचून दाखविली. तेंव्हा मला कळलं की त्या इंडॉलॉजीच्या सुद्धा अभ्यासक होत्या. प्राच्य विद्येमध्ये त्यांनी MA MPhil केलं होतं. बाईंचा विज्ञान आणि कला शाखेतही लीलया वावर होता.

 

२००५ साली त्या पहिल्यांदाच माझ्या घरीनिगडीला, पुण्याहून बसने आल्या होत्या. त्यांना घ्यायल्या मी बसस्टॉपवर गेले होते. बसस्टॉप ते घर हा आमचा प्रवास म्हणजे एक छोटीशी शैक्षणिक सहलच झाली. रस्त्यात दिसलेल्या झाडांची वैशिट्येपुराणकथांमध्ये आलेले त्यांचे संदर्भ ऐकून मी भरून पावले. त्यांचा व्यासंग पाहून माझं मन अपार आदरानंआनंदानं भरून आलं.

 

नुकतीच बाईंनी ८० वर्षे पूर्ण केली. वृद्धत्वाने त्यांच्या शरीरावर आपली मोहोर उमटवली आहे. पण याही वयात त्या आपली तत्वं जोपासत स्वतंत्रपणे जगत आहेत. मलाही तसंच जगायचं आहे.

 

बाईंचा राहण्या वागण्यातील साधेपणाबंडखोरपणापर्यावरणस्नेही जीवनशैलीप्राणीप्रेमलेखनवाचनाची आवडअभ्यासू वृत्ती यांसारखे कित्येक गुण नकळत माझ्यातही पाझरले आहेत. त्यावर माझं व्यक्तिमत्व पोसलं गेलंय. समृद्ध झालंय. या दृष्टीनं त्या माझ्या मेंटॉर आहेत. पण हे त्यांना माहिती नाही. आणि मलाही या लेखाच्या निमित्ताने पहिल्यांदाच लक्षात येतेय!