मार्गदर्शिका म्हणजे मार्ग दाखवणारी, आपल्या चांगल्या- वाईटामध्ये समप्रमाणात सहभाग घेणारी, स्वतः खंबीरपणे प्रत्येक आव्हानाला उत्तर देणारी आणि द्यायला शिकवणारी.
प्रत्येकाला एका प्रेरणेची, उत्साहाची गरज असते. अशा माझ्या प्रेरणास्रोत म्हणजे डॉ. कविता बक्षी मॅडम!
होय, माझ्यासारख्याच त्या इतर अनेक विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका आहेत, प्रेरणास्रोत आहेत. प्रत्येक आव्हान हसत कसं स्वीकारावं, त्याला खंबीरपणे तोंड कसं द्यावं हे मी त्यांच्याकडूनच शिकले, अजूनही शिकत आहे.

My mentor Suvarna Domde

शून्यातून स्वतःला कसं निर्माण करावं, आपले पाय कोणी खेचले किंवा आपल्याला कोणी विरोध केला तरीही आपलं ध्येय पूर्ण होईपर्यंत निर्भिडपणे चालत राहायचं हे मी त्यांच्याकडूनच शिकले.
कविता मॅडम बद्दल लिहायला शब्द अपुरे आहेत पण त्यांच्याबद्दल विचार केला की त्यांच्या आयुष्याच्या प्रवासासाठी मला विं. दा. करंदीकरांची एक कविता आठवते. त्या कवितेचा शब्द नि शब्द त्यांच्या आयुष्याचा प्रवास वर्णन करतो. त्या कवितेचे शीर्षक आहे- ‘ आयुष्याला द्यावे उत्तर
असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावूनी अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची!
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना!
संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!
करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास  सा-या, निरोप शेवटचा देताना!
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!
कविता मॅडम फक्त माझ्या गुरूच नाहीत, तर मैत्रीण, शुभचिंतक, आणि वेळ पडली तर कान ओढणारीही व्यक्ती आहेत! अगदी आईप्रमाणेच!! म्हणूनच आम्ही त्यांना ’आई’ किंवा ’मॉं’ असेही म्हणतो.
परमेश्वराच्या चरणी त्यांच्या उदंड आणि स्वास्थ्यपूर्ण आयुष्यासाठी प्रार्थना…