1. कोरोना व्हायरस अन्नाद्वारे संक्रमित होऊ शकतो का?

नाही. असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. कोरोनाला वाढण्यासाठी होस्ट (मनुष्य किंवा प्राणी) यांची आवश्यकता असते. तो अन्नात वाढू शकत नाही.

2. अंडी, कोंबडी किंवा माश्यांमधून कोरोना पसरु शकतो का?

कोरोनाचा प्रसार प्राण्यांपासून (विशेषत: खवले मांजर, वटवाघूळ अशा वन्य प्राण्यांपासून) झाला असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. परंतु नेमका स्रोत अद्याप माहित नाही. अंडी, चिकन, मासे व्यवस्थित शिजवून खाल्ल्यास त्यातील विषाणू नष्ट होतात. त्यामुळे हे पदार्थ चांगले शिजवून खायला हरकत नाही.

3. कोरोना संक्रमित व्यक्तीने तयार केलेले किंवा हाताळलेले अन्न खाल्ल्यास कोरोनाची लागण होऊ शकते का?

कोरोना व्हायरस खोकताना आणि शिंकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांवाटे पसरतो. संक्रमित लोकांच्या शौचामध्ये देखील हा विषाणू सापडला आहे. म्हणून एखाद्या संक्रमित व्यक्तीद्वारे तो अन्नात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे विशेषतः कच्च्या, न शिजवलेल्या आणि थंड अन्नाच्या बाबतीत तसेच खाण्यासाठी वापरल्या गेलेल्या साहित्याबाबतीत लागू पडते. म्हणून अन्न तयार करताना आणि हाताळताना सर्व खबरदारीचे उपाय घेणे महत्वाचे आहे.

4. एखादा विशिष्ट अन्नपदार्थ प्रतिकारशक्ती वाढवू शकतो का किंवा कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून रोखू शकतो का?

नाही, असा कोणताही जादूई खाद्यपदार्थ अस्तित्वात नाही! निरोगी जीवनशैली (नियमित व्यायाम, सकस आहार, पुरेशी विश्रांती) रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवते. यामुळे करोनाचा संसर्ग होणारच नाही असे नाही; पण संसर्ग झाल्यास त्यातून लवकर बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि झिंकने समृद्ध असलेले अन्न प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करू शकते पण याबाबतीत अजून पुरेसे संशोधन व अभ्यास झालेला नाही.

5. कोरोनाच्या दृष्टिकोनातून खाण्या- पिण्याच्या बाबतीत कोणती खबरदारी घ्यावी?

खाण्यापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि शिजवलेले अन्न हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. आजारी असल्यास अन्न शिजविणे टाळावे. जर ते टाळता येत नसेल तर स्वयंपाक करताना नाक व तोंड रुमालाच्या साहाय्याने झाकून घ्यावे. हातांच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी. बाहेरचे अन्न (विशेषत: कच्चे अन्न, ताजे रस, रस्त्याच्या कडेला असलेले खाद्य) आणि थंड पदार्थ (आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक्स) टाळावे. भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, गरम पेये (सूप, गरम पाणी, वरण, काढा) घ्यावी. आले, तुळस, हळद, पुदीना, लवंगा यासारख्या घशाला आराम देणाऱ्या पदार्थांचा काढा करताना व स्वयंपाकात वापर करावा. तंबाकू आणि मद्यपान टाळावे.