कोरोना व्हायरस जगभरात वाढायला लागल्यापासून आपल्या आहारातील व्हिटॅमिन सी चर्चेत आले आहे! व्हिटॅमिन सी ची सप्लिमेंट्स घेऊन आपली रोग प्रतिकारशक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल अशा वेड्या आशेपायी अनेकजण दररोज व्हिटॅमिन च्या गोळ्या घेत आहेत. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. जास्त प्रमाणात घेतले तर हे जीवनसत्व शरीरात साठवले जाऊ शकत नाही. हे जास्तीचे व्हिटॅमिन सी लघवीवाटे शरीरातून बाहेर टाकले जाते! म्हणून या जीवनसत्वाच्या गोळ्या घेण्यापेक्षा रोजच्या आहारात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन सी घेणे आवश्यक आहे.

रोजच्या आहारातून दररोज पुरेसे व्हिटॅमिन सी कसे मिळवायचे?

1. जवळपास सर्वच ताजी फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते. दररोज ५ वाट्या भरून ताज्या भाज्या, सॅलड व फळे यांचे सेवन केल्यास पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळू शकते.

२. यापैकी किमान एक तरी भाजी अथवा फळ व्हिटॅमिन सी समृद्ध गटातील हवे. व्हिटॅमिन सी समृध्द फळे आणि भाज्यांची यादी खालीलप्रमाणे:
आवळा
संत्री
मोसंबी
किवी
लिंबू
पेरू
स्ट्रॉबेरी
कच्चा आंबा (कैरी)
टोमॅटो
ढोबळी मिरची
ब्रोकोली

३. व्हिटॅमिन सी उच्च तापमानात नष्ट होते. म्हणून ही फळे आणि भाज्या कापल्यानंतर ताबडतोब खाव्या. भाज्या कमीत कमी – अगदी गरजेपुरत्या शिजवाव्या.

४. सध्या लॉकडाऊनच्या काळात जर ताजी फळे आणि भाज्या उपलब्ध नसतील तर आपण हे करू शकता-

च्यवनप्राश, आवळा सुपारी, आवळा जॅम (मोरावळा), लिंबू / आवळा लोणचे घ्या.

लिंबे उपलब्ध असतील तेव्हा त्यांचा रस काढून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा (डीप फ्रीजरमध्ये ठेवल्यास तो अनेक महिने चांगला राहतो). ताजी लिंबे उपलब्ध नसताना हा रस वापरता येईल.

मोडाची कडधान्ये हा देखील व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. फळे आणि भाज्यांच्या कमतरतेवेळी तुम्ही हा पर्याय सहज वापरू शकता.